नाशिक । राज्यातील जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात मोठा बदल करण्यात आला असून, यापुढे पोटहिश्शा जमीन खरेदी करतांना अधिकृत नकाशा असणे अनिवार्य ठरणार आहे. शासनाने मुद्रांक व नोंदणी विभागाला स्पष्ट आदेश दिले असून, नकाशा नसल्यास खरेदी दस्त नोंदवला जाणार नाही. या निर्णयामुळे राज्यात खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत.
मात्र आता शेतजमीन खरेदी-विक्रीच्या दस्तांमध्ये जर क्षेत्रफळ प्रमाणभूत असेल आणि जमीन ओळख पटवण्यासाठी आवश्यक वर्णन नमूद केलेले असेल, तर अशा दस्तांसाठी मोजणी नकाशा जोडणे आता बंधनकारक राहणार नाही, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक राजेंद्र गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
नाशिक विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या या स्पष्टीकरणानुसार, दस्तामध्ये मिळकतीचे ओळख पटण्याइतपत वर्णन दिले असल्यास, मोजणी नकाशाची आवश्यकता उरत नाही. त्यामुळे, नागरिकांना नकाशा मिळवण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि प्रशासनिक अडथळे टाळता येणार आहेत.
यासोबतच, दस्तावेज नोंदणीसाठी लागणार्या कागदपत्रांच्या यादीत कोणताही बदल अथवा वाढ करण्यात आलेली नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच, यापूर्वी ज्या कागदपत्रांवर नोंदणी प्रक्रिया होत होती, तीच यापुढेही लागू राहणार आहेत.
राजेंद्र गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जमीन खरेदी करताना दस्तामध्ये मिळकतीचे स्पष्ट वर्णन असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळणे कठीण जाऊ शकते.










