नाशिक । मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे गुरूवार (दि.२२) रोजी नाशिक दौरयावर येत आहेत. मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच भुजबळ नाशिकमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि समता परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्याने राष्ट्रवादी आणि भुजबळ समर्थकांनामध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. अद्याप पर्यंत भुजबळांना खाते जाहीर झाले नसले तरी अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी त्यांच्या सोपवली जावू शकते. तर नाशिकमधून आता भुजबळांना पालकमंत्री करा अशी मागणी पुढे आली आहे.
भुजबळ यांचे सकाळी ११ वाजता इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लॅन्ड समोरील हायवे येथे आगमन होणार आहे. याठिकाणी त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी भवन मुंबई नाका येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येईल. यावेळी ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
दुपारी ३.३० वाजता ते येवल्याकडे प्रयाण करतील. त्यानंतर ४.३० वाजता विंचूर येथे तर ५ वाजता येवला संपर्क कार्यालय येवला येथे त्यांचे आगमन होणार आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीला भुजबळांचे ‘बळ’
ओबीसींची नेता अशी भुजबळांची देशपातळीवर ओळख आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी देशभर संघटन उभे केले. त्यामुळे समाजाचा एक मोठा जनाधार भुजबळांच्या पाठीशी असल्याने राष्ट्रवादी किंवा भाजपला भुजबळांची नाराजी परवडण्याजोगी नव्हती. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. अशावेळी भुजबळांसारख्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान देऊन बेरजेचे राजकारण केले.
नाशिक सारख्या महत्वाच्या महापालिकेत पक्षाला त्याचा फायदा होईल. मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान भुजबळांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना आव्हान दिले. भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाने नाशिकचेही वजन राज्यस्तरावर वाढणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे ७ आमदार असून दोन मंत्री आहेत त्यातच आता भुजबळांनाही मंत्रिपद देण्यात आल्याने नाशिकमध्ये निश्चितपणे राष्ट्रवादीचे बळ वाढणार आहे.










