नाशिक : राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रित येण्यावर राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत आपली स्पष्ट भूमिका मांडली.
भुजबळ म्हणाले, अजून मला काही माहिती नाही. तुम्ही विचारता म्हणून मी कमेंट करतोय. मात्र एकत्र येणे चांगले आहे, पूर्वी भाजप-सेना युती होती, त्यावेळी त्यांना चांगली संधी होती. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते. माझ्या शुभेच्छा आहेत. जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर निश्चितपणे ठाकरे कुटुंबाची पुन्हा सद्दी येऊ शकते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले, ही निवडणूक जवळ आली आहे. दोघे एकत्र आले, तर यश मिळू शकते. पण अटी-शर्ती एकमेकांना मान्य आहेत का, हे पाहावे लागेल.
प्रादेशिक पक्षांची ताकद
भुजबळ यांनी प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेवरही भाष्य केले. दक्षिण भारतात, पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये स्थानिक पक्ष प्रभावी झाले आहेत. त्या त्या राज्यांचे प्रश्न आणि जनतेच्या मागण्या स्थानिकांना अधिक भावतात, असे त्यांनी नमूद केले.
राज ठाकरे भेटींवर भाष्य
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रश्न विचारता भुजबळ म्हणाले, जर ते फक्त भोजनासाठी जात असतील तर ती चर्चा राजकारणापासून अलिप्त असते का? नक्कीच त्यात राजकीय चर्चा होत असते.
पवार-ठाकरे कुटुंब एकत्र यावे का?
ठाकरे कुटुंबासारखे पवार कुटुंबही एकत्र यावे का, या प्रश्नावर भुजबळ भावुक झाले. माझे कुटुंब वा कुठलेही कुटुंब फुटले, तर त्यात आनंद नाही. राजकारणात वेगळी झालेली कुटुंबे एकत्र आली तर त्यात फक्त आनंद आहे, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, दोन्ही ठाकरे घरातून लढवय्ये आहेत. त्यांची एकत्र येणे ही राजकारणातील मोठी घडामोड ठरू शकते.








