नाशिक । महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवण्याच्या तयारीत आहेत. येत्या १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता, गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळ आपली ‘जळजळीत तोफ’ धडाडवणार आहेत.
या व्याख्यानात ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर भुजबळ आपली ठाम भूमिका मांडणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर या मुद्द्याला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून भुजबळ यांचे उद्गार आता विशेष लक्षवेधी ठरणार आहेत.
याशिवाय, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेबाबतचा निर्णयदेखील या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक गूढ आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. भुजबळ गेली अनेक वर्षे जातीनिहाय जनगणनेसाठी देशभरात सक्रिय राहिले आहेत. त्यांनी यासाठी न्यायालयात लढा दिला, संसदेमध्ये आवाज उठवला आणि जनआंदोलनही राबवले आहे.
समता परिषद या संघटनेच्या माध्यमातून ते सातत्याने जातीनिहाय विकास आराखडे तयार करण्याची मागणी पुढे रेटत आले आहेत. त्यामुळे वसंत व्याख्यानमालेत ते या दोन मुद्द्यांवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










