मुंबई । राज्यात मान्सूनपूर्वीच अवकाळीचा चांगलाच तडाखा बसला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस अवकाळीचा अंदाज वर्तवलेला असतांना आता पुन्हा एक नवे संकट समोर येत आहे. बंगालच्या उपसागरात ‘शक्ती’ नावाचे नवे चक्रीवादळ तयार होत असून येत्या काही दिवसांत त्याचे तीव्र स्वरूप धारण होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
या चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, तसेच उत्तर अंदमान समुद्राचे काही भाग आणि किनारी राज्यांवर जाणवणार आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, २३ ते २८ मे दरम्यान या वादळाचा प्रचंड प्रभाव जाणवू शकतो.
या राज्यांना धोक्याचा इशारा
IMD च्या १४ मे रोजीच्या निवेदनानुसार, तमिळनाडूच्या किनार्यापासून नैऋत्य दिशेने सुमारे १.५ किमी उंचीवर वायूचा चक्राकार प्रवाह तयार झाला आहे. १६-१७ मे दरम्यान नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोकण, बंगालच्या उपसागरातील काही भाग तसेच संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांवर सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे.
चक्रीवादळ ‘शक्ती’च्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील खुलना भागात सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्रात जाण्यावर निर्बंध
हवामान विभागानुसार, मे महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन वेगवेगळ्या क्षेत्रांत कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. त्यापैकी एकाने ‘शक्ती’ या चक्रीवादळाचे रूप घेतले असून, यामुळे किनारी भागांत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि पुरासदृश परिस्थिती उद्भवू शकते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने समुद्रात मासेमारी अथवा अन्य प्रवास टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, किनारी भागांतील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
ढगाळ वातावरणाची शक्यता
पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मालदीव आणि कोमोरिन भागात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले असून, पुढील काही दिवसांत या भागांमध्येही हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.





