बागुल-राजवाडे यांना दिलासा; भाजप प्रवेशाचे दरवाजे खुले

नाशिक – शिवसेना (ठाकरे गट) चे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांना कायदेशीर सुटकेचा दिलासा मिळाल्याने त्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी एका मारहाण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश स्थगित करण्यात आला होता.

मात्र, संबंधित प्रकरणात तक्रारदारानेच आपली तक्रार मागे घेतल्याने, पोलिसांकडून गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तक्रारदाराने पोलिसांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, त्यांच्यावर कोणतीही मारहाण झाली नव्हती.

या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांचा भाजप प्रवेश लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नाशिकचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने, उध्दव ठाकरे यांनी महानगरप्रमुखपदाची जबाबदारी मामा राजवाडे यांच्याकडे सोपवली होती. मात्र, राजवाडेंवर गुन्हा दाखल होताच त्यांच्या प्रवेशावर अडथळा निर्माण झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही शोधण्यासाठी मोहीम राबवली होती. तेव्हा ते अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील होते आणि काही काळ अज्ञातस्थानी होते. त्यामुळे त्यांची नोंद पोलिसांकडून ‘फरार’ अशी करण्यात आली होती.

या प्रकरणामुळे भाजपवर टीका झाली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले होते की, “गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना पक्षात घेतले जात आहे.”

आता, तक्रार मागे घेतल्याने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!