भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी; म्हणजे नेमकं काय होणार ?

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यांना भारतीय वायुसेनेने हवेतच उडवून लावले. या कारवायांमुळे संपूर्ण देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

शस्त्रसंधी म्हणजे नेमकं काय?
शस्त्रसंधी म्हणजे दोन देशांमधील एक तात्पुरता किंवा कायमस्वरूपी करार, ज्याद्वारे एकमेकांवरील सैनिकी कारवाया तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबार, बॉम्बहल्ले किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सैनिकी कारवाया थांबवण्याचे मान्य केले आहे. तसेच, संघर्ष वाढवणाऱ्या कोणत्याही हालचाली न करण्याचेही ठरवण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात आला आहे.

या शस्त्रसंधीत ठराविक गोष्टी मान्य केल्या जातात:

सीमारेषेवर सर्व प्रकारच्या शस्त्र कारवाया थांबवणे.

युद्धजन्य परिस्थिती उद्भवेल अशी कोणतीही कृती टाळणे.

शांतता प्रस्थापित करून प्रश्नांची सोडवणूक करणे.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. युद्धाचे परिणाम अत्यंत गंभीर असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत शस्त्रसंधी हे शहाणपणाचे पाऊल मानले जाते.

तथापि, पाकिस्तानकडून यापूर्वी अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, फक्त 2020 मध्येच पाकिस्तानने 4,645 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 2018 मध्ये 1,629 वेळा, तर 2019 मध्ये 3,168 वेळा हे उल्लंघन झाले होते. अशा परिस्थितीत भारताचे जवान सतत सीमांचं रक्षण करत असून कोणतीही आगळीवेगळी हालचाल झाली तरी त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत.

शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यास संबंधित देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दडपणाला सामोरे जावे लागते. अमेरिका, रशिया, चीनसारखे देश आणि संयुक्त राष्ट्र यांच्याकडून दबाव येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

शेवटी, हा करार कायमस्वरूपी शांततेकडे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!