शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता

नाशिक । आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ विस्तारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. यामध्ये दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्याचा समावेश आहे. यासोबतच विमानतळाच्या विस्तारीकरण व अद्ययावतीकरणाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.


महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची ९१ वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे, विविध विभागांचे अधिकारी तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळी, शिर्डी विमानतळ हवाई मार्गे येणार्‍या भाविकांसाठी अत्यंत सोयीचे ठरेल. यासाठी शिर्डी विमानतळाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी कुंभमेळ्याच्या वेळी विमाने आणि हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यासाठी विमानतळाच्या विस्तारीकरणाची गरज लक्षात घेत, यामध्ये ८ वाहनतळे, दोन हेलिपॅड्स, तसेच टर्मिनल अद्ययावत करणारे काम असणार आहे.

लातूर, कराड आणि चंद्रपूर विमानतळांचा विकास
मुख्यमंत्र्यांनी लातूर विमानतळाच्या विकासाचे महत्त्व सांगितले. लातूर जिल्ह्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये विकास आणि विस्तार होत असल्यामुळे, लातूर विमानतळ हा नजीकच्या बीड, धाराशिव या जिल्ह्यांसाठी देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चंद्रपूर विमानतळावर चार्टर्ड विमाने उतरू शकतील अशी सुविधा तयार करणे आणि गडचिरोली विमानतळासाठी पर्यायी जागांचे विचार करणे या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

error: Content is protected !!