नाशिक । महायुती सरकारमधील बेजबाबदार आणि बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांविरोधात शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यभरात आंदोलनाचे हाक दिली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. नाशिकमध्येही ठाकरे गटाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सुरूवातीला माजी महापौर विनायक पांडे हे अनुपस्थित असल्याने एकच चर्चा रंगली होती मात्र काही वेळाने पांडे आंदोलन स्थळी दाखल झाल्याचे दिसून आले.
नाशिक येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीत एम.डी ड्रग्जच्या मुददयावरून पक्षाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी भाष्य करत विधानसभेत हा मुददा उचलून धरायला हवा होता असे भाष्य केले. यावरून नाराज झालेले माजी महापौर विनायक पांडे आणि दिंडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले.
पांडे यांनी दिंडेंच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत आम्ही देखील चाळीस वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहोत जर विधानसभेत आपण कमी पडलो असतो तर अजय बोरस्ते, सुनिल बागुल यांच्यापेक्षा अधिक मते गीतेंना कशी मिळाली असा सवाल उपस्थित केला. यानंतर पांडे बैठीतून निघून गेले. त्यामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसून येत आहे. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, सुनिल बागुल, मामा राजवाडे आदींसह माजी नगरसेवकांनी भाजप, शिंदे सेनेत प्रवेश केल्याने आता पांडे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले.
सोमवारी शिवसेनेच्यावतीने महायुती सरकारच्या बेताल वक्तव्य करणार्या मंत्र्यांविरोधात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चावेळी शिवसेनेच सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र माजी महापौर विनायक पांडे उपस्थित नसल्याने उपस्थितांमध्ये पांडेंच्या नाराजीबाबत चर्चा सुरू होती.
मोर्चा शालीमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाजवळ येउन पोहचला. काही वेळाने विनायक पांडे यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले. त्यामुळे पांडेंची नाराजी दूर झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.









