नाशिक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया समोर छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्याची जोरदार मागणी करत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.
या होर्डिंग्जमध्ये “छगन भुजबळ यांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्या” अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. हे होर्डिंग्ज राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे अध्यक्ष आबांदास खैरे आणि ओबीसी आघाडीचे अध्यक्ष अमोल नाईक यांच्या वतीने लावण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. छगन भुजबळ देखील या बैठकीस उपस्थित राहणार असून, त्यांच्या मंत्रिपदावरून सुरु असलेल्या चर्चांना या बैठकीत दिशा मिळण्याची शक्यता आहे.
भुजबळ एक अनुभवी अन जेष्ठ नेते असूनही मंत्री मंडळात त्यांना स्थान देण्यात न आल्याने भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी आहे. स्वतः भुजबळ यांनी देखील याबाबत अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करत विकास कामे सुरू ठेवली. दर आठवड्याला आपल्या येवला मतदार संघात उपस्थित राहून ते जनतेच्या भेटीगाठी घेत असतात. पण कुठंतरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र या विषयीची नाराजी कायम असल्याच या होल्डिंग वरून दिसून येते.
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापले असून, कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











