कृषीमंत्री कोकाटे संतापले ; म्हणाले विरोधकांना कोर्टात खेचणार

नाशिक । कृषीमंत्री माणिकराव कोकाटे एका नव्या वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ ट्विट करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ माजला असून विरोधकांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, हा फारसा मोठा विषय नाही. पण त्यावरून अनावश्यक राजकारण सुरू झाले आहे. ऑनलाईन रमी खेळण्यासाठी मोबाईल नंबर आणि बँक खाते लिंक करावे लागते. माझे कोणतेही खाते अशा अ‍ॅप्लिकेशन्सना लिंक केलेले नाही. मी रमी खेळत नाही, खेळलीही नाही.

आरोप बिनबुडाचे, कोर्टात खेचणार
कोकाटे म्हणाले, माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. या व्हिडीओमुळे माझी महाराष्ट्रभर बदनामी झाली आहे. विरोधकांनी मुद्दाम हे प्रकरण उचलून धरले आहे. या आरोपामागे काही राजकीय कारस्थान आहे. ज्यांनी माझी बदनामी केली, त्यांच्यावर मी अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे आणि कोर्टात खेचणार आहे.

व्हिडीओ अपूर्ण, खरे चित्र समोर आले नाही
कोकाटे यांनी व्हिडीओबाबत खुलासा करत सांगितले, त्या दिवशी मी सभागृहात होतो. ओएसडीकडून माहिती घेण्यासाठी मी दुसरा मोबाईल वापरत होतो. मोबाईल सुरू करताच गेमचा पॉप-अप आला. तो स्कीप करता आला नाही. मोबाईल नवीन होता. फक्त 11 सेकंदांचा व्हिडीओ दाखवण्यात आला, पण मी गेम स्कीप केल्याचा भाग कोणीच दाखवला नाही. त्यामुळे चुकीची प्रतिमा निर्माण झाली.

दोषी ठरलो, तर थेट राजीनामा देईन
कोकाटे म्हणाले, मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. चौकशीत मी दोषी ठरलो, तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मी थेट राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देईन. मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्याला भेटणारही नाही.

error: Content is protected !!