ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवारांचे मोठं वक्तव्य

कोल्हापूर । गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली शरद पवार आणि अजित पवार यांची संभाव्य जवळीक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोल्हापूर दौर्‍यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत या विषयावर सूचक प्रतिक्रिया दिली.

दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर चांगलं काम करत असतील, तर त्यात वाईट काहीच नाही. मतभेद विसरून एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं ठरेल, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘काका-पुतण्यांच्या’ राजकीय एकत्र येण्याच्या चर्चांना नवा ऊत आला आहे.

दुसरीकडे, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या सक्तीच्या हिंदीविरोधातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पहिली ते चौथी या शालेय वर्गांमध्ये हिंदी सक्तीची गरज नाही. मात्र, पाचवीपासून हिंदी शिकणं आवश्यक आहे. हिंदीला पूर्णतः नाकारणं योग्य ठरणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.

राज ठाकरे यांच्या मोर्चाविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांनी मोर्चात सहभागी व्हा असं म्हटलं आहे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं. मात्र, कुठल्याही विषयावर भूमिका घेताना आधी ती समजून घ्यावी लागते. जर निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल, तर भूमिका घेण्यात काही अडचण नाही.

शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका वाचल्याचंही सांगितलं आणि मुंबईत परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं. या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा सैरभैर झालं असून आगामी दिवसांत कोणती नवी समीकरणं उभी राहतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

error: Content is protected !!