Nashik property: नाशिकमध्ये हक्काचं घर तेही १५ लाखांत

नाशिक । नाशिकचा विकास झपाट्याने होत आहे. मुंबई, पुण्यानंतर सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या शहरांमध्ये नाशिकचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. समृद्धी महामार्ग, इगतपुरी, दिंडोरी येथे होणारा औद्योगिक विकास यामुळे नाशिकमध्ये घरांची मागणी वाढू लागली आहे. उत्तम हवामान, मुबलक सुविधा, सर्वोत्तम जीवनशैलीचा आनंद देणार्‍या गृहप्रकल्पांची वाढती संख्या यामुळे नाशिकमध्ये आता घर घेण्यास पसंती मिळत आहे. आपणही जर नाशिकमध्ये घर घेण्याचे विचार करत असाल तर आता फक्त १५ लाखांत, तेही शहरी भागात घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

म्हाडाच्या नाशिक विभागीय मंडळाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत तब्बल 478 घरे विक्रीसाठी खुली केली आहेत. ही घरे गंगापूर, देवळाली, पाथर्डी, म्हसरूळ, नाशिक आणि आगर टाकळी या भागांत बांधण्यात आली आहेत.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकचा चेहरामोहरा बदलणार आहे. सुमारे १५ हजार कोटी रुपयांची विकासकामे या निमित्ताने प्रस्तावित करण्यात आली आहेत. यासोबतच प्रस्तावित आयटी हब, इगतपुरी आडवण येथे महिंद्रा कंपनीचा येणारा प्रकल्प, दिंडोरी येथे काही कंपन्यांनी हजारो कोटींच्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र शासनासोबत केलेला करार यामुळे भविष्यात नाशिक मंत्रीभूमीबरोबरच यंत्रभूमी म्हणूनही नावारूपाला येणार आहे. त्यामुळे येथे घरांची मागणीही वाढू लागली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते नोंदणी व अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ झाला. इच्छुकांना 4 ऑक्टोबर 2025 पर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची संधी असून, अर्ज दाखल करण्याची अंतिम वेळ 3 ऑक्टोबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

परवडणार्‍या किमतीत घरे
ही घरे 15.51 लाख ते 27.10 लाख रुपये या किंमत श्रेणीत उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणार्‍या दरात घर मिळण्याची संधी आहे. नेहमीच विकासकांकडून 20 टक्के योजनेतील घरांना प्राधान्य दिले जात नाही; मात्र नाशिक म्हाडाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यंदा मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध झाली आहेत.

सोडतीची प्रक्रिया
अर्जांची छाननी करून 17 ऑक्टोबर 2025 रोजी पात्र अर्जदारांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, अंतिम सोडतीचा निकाल केव्हा आणि कुठे जाहीर होणार याची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.

नोंदणी कुठे करायची?
इच्छुकांनी नोंदणी व अर्ज प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://lottery.mhada.gov.in पूर्ण करावी, असे आवाहन नाशिक म्हाडा मंडळाने केले आहे.

error: Content is protected !!