नाशिक । राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र अरण येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित असताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी श्री क्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली होती. यावेळी सभेत बोलताना लवकरच या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आज राज्य शासनाच्या वतीने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
श्री क्षेत्र अरण या तीर्थक्षेत्रास अ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने या ठिकाणी अधिक विकास कामे होऊन या तीर्थक्षेत्राचा अधिक विकास होणार आहे.











