त्र्यंबकेश्वर विकासासाठी २७५ कोटींच्या आराखडयाला मंजूरी, असा होणार विकास

नाशिक । राज्य मंत्रिमंडळाच्या अहिल्यानगर जिल्हयातील चौंडी येथे झालेल्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी २७५ कोटींच्या विकास आराखडयाला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आता त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला असून कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.


एप्रिल महिन्यात त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राला ‘अ’ वर्ग दर्जा देण्यात आला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगरपरिषदेच्या सहकार्याने त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार केला आहे. त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्र ‘अ’ दर्जा देण्यात आल्याने काही कामे हे तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले.

त्यानूसार तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ३०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला. तर उर्वरित ८०० कोटींचा आराखडयातील कामे ही विविध यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यानूसार ३०० कोटींचा आराखडा चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर सादर करण्यात आला. मंत्रिमंडळाने 275 कोटींच्या आराखडयाला मंजूरी दिल्याने त्र्यंबक तीर्थाक्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही कामे होणार
दर्शनपथांचे सुशोभीकरण
पुरातन मंदिरे व कुंडांची देखभाल-दुरुस्ती
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण
वाहनतळांची उभारणी
स्वच्छतागृहांची वाढ आणि नूतनीकरण
अतिक्रमित दुकानदारांचे पुनर्वसन
परिसरातील मंदिरांचे नुतनीकरण

error: Content is protected !!