नाशिक । माजी उपनेते सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर काल (१७ जून) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना बडगुजरांच्या प्रवेशाला समर्थन दर्शवले असून, त्यांना पक्षाच्या शिस्तीने वागण्याचा सल्ला दिला आहे.
फडणवीस म्हणाले, होय, विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर टीका झाली होती. आमचे आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला होता. मात्र चौकशीनंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता त्यांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली, आणि आम्ही त्यांचे स्वागत करतो.
पक्ष वाढवायचा आहे, विरोध नव्हता
सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुरुवातीला कल्पना नसल्याचे समोर आले होते. मात्र नंतर गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार, बावनकुळे स्वतः त्या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित होते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण बाब कम्युनिकेशन गॅपमुळे घडली असावी. कोणताही सक्रिय विरोध नव्हता. अनेक स्तरांवर चर्चा झाल्यावर निर्णय घेण्यात आला. आम्हाला पक्ष वाढवायचा आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
पक्षाच्या नीतिनियमांचे पालन गरजेचे
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जुना इतिहास काहीही असो, आता भाजपच्या विचारधारेनुसार आणि पक्षाच्या नीतिनियमांचे पालन करून वागणे अपेक्षित आहे. याच दृष्टीने सुधाकर बडगुजर यांना संधी देण्यात आली आहे.









