नाशिक । सत्ताधार्यांच्या अर्थकारण आणि सत्ताकारणाच्या विरोधात आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर केंद्रबिंदू ठेवत लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधून महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये दिला.
मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शिंदे बोलत होते. पदभार स्वीकारल्यानंतरच्या उत्तर महाराष्ट्र दौरयात नाशिक हे त्यांचे पहिले ठिकाण ठरले. या वेळी त्यांनी स्पष्ट केले की, सध्याचे सरकार कर्जाच्या खाईत असून, गरिबांसाठी निधी अपुरा आहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत असून, पक्ष म्हणून याविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.
ते पुढे म्हणाले, आज शेतकरी, कामगार, आणि सर्वसामान्य जनतेत असंतोष आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण आंदोलनाची दिशा ठरवली आहे, पक्ष संघटनेबाबत बोलतांना ते म्हणाले, आगामी काळात पक्षात काम न करणार्यांना निष्क्रिय पदाधिकारयांना नारळ आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना साथ, हे धोरण पक्ष राबवणार आहे.
मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपली मते परखडपणे मांडली. सुरेश आव्हाड यांनी पक्षासाठी झटणार्यांना दुय्यम स्थान मिळाल्याची खंत व्यक्त केली, तर कल्पना अहिरे यांनी महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी देण्याची मागणी केली.
पक्षातील काही गटबाजी, स्थानिक नेतृत्वातील मतभेद यावरही चर्चा झाली. पांडुरंग तुपे, निलिमा आहेर आणि संतोष गाडेकर यांनी शेतकर्यांचे प्रश्न आणि पक्ष संघटन मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी मागील निवडणुकांतील चुका लक्षात घेत आता निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा उमेदवारी दिली तर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होईल, त्यामुळे निष्ठावंतांचा विचार करावा अशी भूमिका त्यांनी मांडली.
महामोर्चा, मालेगाव कामगार प्रश्न, आणि आगामी नगरपालिका व महापालिका निवडणुकांची तयारी यांसारख्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्ष आता रस्त्यावर उतरून लढणार असून, जनतेच्या मनात हा खरा विरोधी पक्ष आहे’ हे अधोरेखित होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.









