मुंबई । एसटी महामंडळ आता उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत असून लवकरच किरकोळ इंधन विक्रीच्या व्यवसायात उतरणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त व्यावसायिक भागीदारीतून हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक आहे. प्रवासी भाड्याच्या माध्यमातून मिळणार्या उत्पन्नावर संपूर्णपणे अवलंबून राहून चालणार नाही, त्यामुळे नव्या उत्पन्न स्रोतांची आवश्यकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
इंधन विक्रीचा अनुभव, आता व्यावसायिक विस्तार
एसटी महामंडळ गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमकडून डिझेल खरेदी करत आहे. सध्या २५१ ठिकाणी महामंडळाच्या जागेवर डिझेल पंप कार्यरत असून ते फक्त एसटी बसेससाठीच इंधन पुरवतात. या अनुभवाच्या आधारावर आता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबर व्यावसायिक करार करून सर्वसामान्य ग्राहकांसाठी देखील पेट्रोल व डिझेल विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवीन ‘पेट्रो-मोटेल हब’ संकल्पना
राज्यभरातील महामंडळाच्या मोक्याच्या जागांवर २५ बाय ३० मीटर क्षेत्रफळ असलेले इंधन पंप उभारण्यात येणार आहेत. यासोबतच रिटेल शॉप्स आणि इतर पूरक व्यवसायही सुरू करण्यात येतील. यामुळे इंधन विक्रीबरोबरच विविध व्यवसायिक संधी निर्माण होतील.
पारदर्शक भागीदारी व स्थायी उत्पन्न
इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांशी एसटी महामंडळ व्यावसायिक करार करणार असून, या करारात पारदर्शकतेला प्राधान्य दिले जाईल. केंद्र व राज्य यांच्यातील भागीदारीतून महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
भविष्यात व्यावसायिक इंधन विक्रीतून सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल, तसेच महामंडळालाही उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल.
प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री, महा.राज्य









