नाशिक विमानतळाची आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीत झेप

नाशिक । नाशिक विमानतळाने मे २०२५ मध्ये १,१४६ मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करून देशात ११व्या क्रमांकाचे मानांकन मिळवले आहे. महाराष्ट्रात मुंबईनंतर नाशिक दुसर्‍या क्रमांकावर आहे, ही बाब नाशिकसाठी ऐतिहासिक मानली जात आहे.

या यशामुळे नाशिकने आंतरराष्ट्रीय व्यापारात स्वतःचा ठसा उमटवला आहे. पूर्वी फक्त मेट्रो शहरांपुरते मर्यादित असलेली कार्गो वाहतूक आता नाशिकसारख्या शहरांनीही सक्षमपणे सांभाळायला सुरुवात केली आहे. यामुळे देशाच्या निर्यात क्षमतेत नाशिककडून ठोस योगदान दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उद्योगाला चालना
एचएएलच्या ओझर विमानतळावरून सुरु असलेल्या कार्गो सेवा – विशेषतः इंडिगो आणि तत्सम कंपन्यांच्या माध्यमातून – नाशिकच्या स्थानिक उत्पादकांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. कृषी प्रक्रिया, औषधनिर्मिती, प्लास्टिक, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रांतील उत्पादक यांना याचा विशेष लाभ झाला आहे.

नाशिकचे हे यश अधिक बळकट करण्यासाठी हवाई मालवाहतुकीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने मालवाहतूक टर्मिनलचे आधुनिकीकरण, २४/७ कस्टम सेवा, थेट आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रयत्न, तसेच मल्टिमोडल लॉजिस्टिक्स हब उभारणीला गती देणे यांचा समावेश आहे. निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी यासाठी शासनाशी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली आहे.

कार्गो हबकडे वाटचाल
मुंबईनंतर महाराष्ट्रात दुसरे आणि देशात ११वे स्थान मिळवलेले नाशिक विमानतळ आता कार्गो हब होण्याच्या दिशेने पुढे जात आहे. योग्य धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास नाशिकचा औद्योगिक आणि निर्यात क्षेत्रातला पुढचा टप्पा अधिक भक्कम होईल, असा विश्वास निमा एव्हिएशन उपसमितीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!