नाशिक । शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातून नाशिकचे ज्येष्ठ नेते व उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली असून, त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांना दूरध्वनीवरून ही माहिती दिली. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत बडगुजर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच त्यांनी ठाकरे गटातील महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10-12 जण पक्षात नाराज असल्याचा दावा करून गटात अंतर्गत अस्वस्थतेला वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेऊन अधिकृत भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत कोण होते उपस्थित?
नाशिक जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत महानगरप्रमुख विलास शिंदे, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदी नेते उपस्थित होते. मात्र, सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. ते नाशिकबाहेर नियोजित कार्यक्रमासाठी गेल्याने परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगण्यात आले.
जिल्हाप्रमुख सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया
गिरीश महाजन म्हणतात शिवसेना उरणार नाही. पण भाजप आज जिथे आहे, ते शिवसेनेमुळेच आहे. शिवसेना कधीच संपणार नाही. नाराजी असले तरी एकजूट आहे. सुधाकर बडगुजर सध्या संभ्रमात आहेत. त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, असे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी सांगितले.
बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया
हकालपट्टीनंतर प्रतिक्रिया देताना सुधाकर बडगुजर म्हणाले, पक्षात नाराजी व्यक्त करणे हा गुन्हा नाही. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणून कारवाई झाली असेल तर ती चुकीची आहे. पक्षाने निर्णय घेतला, तो स्वीकारतो. मात्र, मला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. मी वेळ आल्यावर पुढील भूमिका स्पष्ट करीन.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
2007 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून नाशिक महापालिकेत निवडून आले.
2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश, संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात.
2009-2012 महापालिकेचे सभागृहनेते, नंतर 2012-2015 विरोधी पक्षनेते.
2014 मध्ये नाशिक पश्चिममधून विधानसभा निवडणुकीत उमेदवार, पराभव.
गेल्या 15 वर्षांपासून नगरसेवक म्हणून कार्यरत.
पुढे काय?
सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी ठाकरे गटासाठी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का मानला जात आहे. बडगुजर कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडे त्यांच्या जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुढील काही दिवस नाशिकच्या राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे आहेत.






