कुंभमेळा प्राधिकरणासाठी अध्यादेश जारी करण्याचा निर्णय

नाशिक । नाशिकमध्ये २०२७ साली होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी स्वतंत्र “कुंभमेळा प्राधिकरण” स्थापन करण्यासाठी लवकरच अध्यादेश जारी करण्याचा निर्णय चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कुंभमेळ्यासारख्या जागतिक पातळीवरील महापर्वासाठी सुसुत्र नियोजन, समन्वय, निधी व्यवस्थापन आणि शाश्वत विकास साधण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याच कारणामुळे तातडीने अध्यादेशाद्वारे या प्राधिकरणाची स्थापना करण्याचे ठरले.

कुंभमेळा प्राधिकरणाला प्रशासकीय व आर्थिक स्वायत्तता असेल. या प्राधिकरणाच्या माध्यमातून नागरी पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक उपाययोजना आणि भाविकांसाठी सुविधा उभारणी यांसाठी एकात्मिक दृष्टिकोनातून काम होईल. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक सुसंगत यंत्रणा उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत करण्यात येत असून, नाशिकमधील लोकप्रतिनिधींनी आणि सामाजिक संस्थांनी या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचा सर्वांगीण विकास होईल आणि भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

अध्यादेशात प्राधिकरणाच्या अधिकार, जबाबदार्‍या, कार्यकक्षा आणि कार्यपद्धती यांचा स्पष्ट उल्लेख असणार आहे. तसेच प्राधिकरणाचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी आणि विविध समित्यांची रचना कशी असेल, याचेही मार्गदर्शन यात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे २०२७ सालचा कुंभमेळा अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि भाविकांसाठी सुरक्षित व सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!