बारावी निकालात टक्का घसरला; काय आहेत निकालाची वैशिष्ट्य ?बघा तुमच्या जिल्हयाचा निकाल

नाशिक । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यंदा राज्याचा एकूण निकाल 91.88 टक्के लागला आहे. याआधी 2024 मध्ये हा निकाल 93.37 टक्के होता. परिणामी यंदा निकालाच्या टक्केवारीत 1.49 टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यभरात कोकण विभागाने सर्वाधिक 96.74 टक्के निकाल देत अव्वल स्थान पटकावले आहे. तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो 89.46 टक्के इतका लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल 91.31 टक्के इतका आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली असून त्यांचा निकाल 94.58 टक्के, तर मुलांचा निकाल 89.51 टक्के इतका लागला आहे. मुलींनी मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक यश मिळवले आहे.

विज्ञान शाखेचा दबदबा
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 97.35 टक्के असून वाणिज्य शाखेचा निकाल 92.68 टक्के आहे. कला शाखेचा निकाल केवळ 8.52 टक्के असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. व्यवसाय अभ्यासक्रम 83.03 टक्के आणि आय.टी.आय. शाखेचा निकाल 82.03 टक्के इतका लागला आहे.

124 केंद्रांवर चौकशी
निकालाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणांचा वाढता त्रास. राज्यातील 3373 केंद्रांपैकी 374 केंद्रांवर अनुचित प्रकार आढळले असून त्यातील 124 केंद्रांवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास या केंद्रांना कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.

विभागनिहाय कॉपी प्रकरणांचा तपशील:
पुणे: 45
नागपूर: 33
छत्रपती संभाजीनगर: 214
मुंबई: 9
कोल्हापूर: 7
अमरावती: 17
नाशिक: 12
लातूर: 37

2027-28 नवीन अभ्यासक्रम
राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून बारावीचा नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे. अभ्यासक्रमात बदल करताना विद्यार्थ्यांची गरज, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि जागतिक स्पर्धेची तयारी लक्षात घेतली जाणार आहे.

निकाल तपासण्याची सुविधा आणि गुणपत्रिका वितरण
निकालाची घोषणा सकाळी 11 वाजता करण्यात आली. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता आला. 6 मेपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळणार आहेत.

आकडेवारीवर एक नजर
नोंदणीकृत विद्यार्थी: 14,27,085
परीक्षा दिलेले विद्यार्थी: 14,17,969
उत्तीर्ण विद्यार्थी: 13,02,873
एकूण उत्तीर्णतेचा टक्का: 91.88

error: Content is protected !!