दिल्ली : इराणमधील तीन अणुउद्योगिक केंद्रांवर अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे तेल उत्पादक प्रदेशात तणाव वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतात एलपीजी सिलिंडरच्या किंमतींवर होण्याची शक्यता आहे.देशातील ३३ कोटी एलपीजी वापरकर्त्यांपैकी बहुतांश जणांना याचा फटका बसू शकतो.
भारतात वापरल्या जाणार्या एलपीजीपैकी सुमारे ६६% गॅस आयात केला जातो. त्यातील ९५% एलपीजी सौदी अरेबिया, यूएई व कतारमधून येतो. अशा परिस्थितीत जर पश्चिम आशियातून पुरवठा खंडित झाला, तर देशात एलपीजीचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
सध्या भारताकडे केवळ १६ दिवस पुरेल इतकाच एलपीजी साठा आहे. म्हणजेच, मोठा पुरवठा अडथळा आल्यास देशभरात एलपीजीची टंचाई जाणवू शकते. पर्यायी पुरवठादार देश जसे अमेरिका, मलेशिया वा आफ्रिकेचे काही भाग असले तरी त्यातून गॅस पोहोचण्यास अधिक वेळ लागतो.
इराणच्या अणुस्थळांवर अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात मोठया तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीती वाढली आहे. पश्चिम आशियामध्ये तणाव वाढतो तेव्हा एलपीजी पुरवठयावर मोठा परिणाम होतो. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे.
भारत हे इंधन मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो आणि गरज पडल्यास ही निर्यात थांबवून देशांतर्गत मागणी भागवू शकतो.
शहरी भागात जर एलपीजीची टंचाई जाणवली, तर विजेवर स्वयंपाक करणे हा एकमेव पर्याय उरतो. कारण केवळ १.५ कोटी घरांपर्यंतच पीएनजी (पाईप वायू) पोहोचलेला आहे.











